अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची प्रकृती गंभीर झाल्यानं त्याला शुक्रवारी (दि. १२) सकाळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात (मेडिकलमध्ये) हलविण्यात आले. गवळीला कोरोनाची बाधा झाल्यामुळे दोन दिवसांपासून त्याच्यावर कारागृहातील रूग्णालयातच उपचार सुरू होते. मात्र, त्याची प्रकृती जास्त बिघडल्यामुळे त्याला शुक्रवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मेडिकलमध्ये नेण्यात आले.
मागील चार दिवसांपासून गवळीची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर तुरुंग अधिकाऱ्यांनी गवळीसह इतर कैद्यांची ‘कोरोना’ चाचणी केली होती. त्यात गवळीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. मागील चार दिवसांपासून अरूण गवळी याच्यावर तुरुंगातील रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. गवळीला दिवसातून तीन वेळा काढा, गरम पाणी व औषधे दिली जात होती. परंतु, या उपचारांचा विशेष फायदा झाला नाही. अखेर आज सकाळी त्याची प्रकृती प्रचंड खालावल्याने गवळीला मेडिकलमधील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. सध्या याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव अरूण गवळी याच्यावर मेडिकल का कारागृहातील रुग्णालयातच पुढील उपचार करावे, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.